मंगलवार, जुलाई 26, 2022

लाईन मारणे -एक अभूतपूर्व कला

*लाईन मारणे - एक अभूतपूर्व कला*

आता ही कला हळूहळू पडद्याआड गेली आहे . फक्त बघून ओळख नसताना सुद्धा एखाद्या आवडत्या मुलीला आपल्या प्रेमात पाडायचे हीच ती कला म्हणजे 'लाईन मारणे !'  

'लाईन मारणे' ही एक शास्त्रीय संकल्पना होती . वर्गातली किंवा एरियातली एखादी सुंदर मुलगी आवडली की मग ही प्रोसेस सुरू व्हायची . ती आवडलेली मुलगी कितीतरी जणीत भन्नाट वगैरे असायची . तिचे एकूणच वर्णन करताना शब्द की काय म्हणतात ते अपुरे पडायचे . मग प्रोसेसची पुढली पायरी , जर ती आपल्या एरियात राहणारी असेल तर तिचे पूर्ण नाव , राहते कुठल्या चाळीत , शाळेत आहे की कॉलेजला , रोज किती वाजता घरातून बाहेर पडते , कशी जाते , बरोबर कुणी असते की एकटीच जाते , हा सगळा अभ्यास केला जायचा . मग तिच्या येण्याजाण्याच्या वाटेवर ती व्यवस्थित दिसेल असे उभे राहून नुसतेच रोज तिला डोळे भरून पाहणे आणि उसासे टाकणे सुरू व्हायचे . मुलगा एकटा उभा असेल तर लोक हसतील म्हणून एखादा फुकटा मित्र सोबतीला घेऊन यथासांग उभे रहायचे . त्या बदल्यात मित्राला वडापाव , लिंबू सरबत  अगदीच डोक्यावरून पाणी म्हणजे वन बाय टू चायनीज सूप पाजायचे कबूल करायचे म्हणजे झाले . दोन दोन दिवसांनी उभे राहण्याची जागा चार पाच फुटांनी इकडे तिकडे केली की झाले . इतक्यात तिचा दुसरा कुणी जवळचा आहे का , असेल तर किती जवळचा आहे वगैरे गृहपाठ पार पडलेला असायचा . लाईन क्लिअर आहे म्हटल्यावर मग गाडी पुढे जायची .

आतापर्यंत तिचे कॉलेज , शाळा यांपैकी कुठे शक्य असेल तेवढी माहिती काढून झालेली असायची . एखादी ओळख काढून झालेली असायची . उद्देश एकच जास्तीत जास्त वेळा तिला बघता यावे . हळूहळू तिला येताना बघून ती जवळ आल्यावर मित्राशी बोलतोय असे दाखवून तिला ऐकू जाईल असे काहीतरी सूचक बोलणे सुरू व्हायचे . ही खरी परीक्षा असायची . आता बघा की जर तिने तिच्यावरून केलेल्या कॉमेंटवर प्रतिसाद दिला तर पुढे प्रगती करता यायची ना ! म्हणजे हे लाईन बहाद्दर एक दोनदा प्रयत्न करून थांबायचे नाहीत , किमान महिनाभर हे असे चालायचे . एकूण तीन प्रकारे याचा अभ्यास केला जायचा . एक ती अजिबात लक्ष देत नाही , दुसरा ती रागाने बघते आणि तिसरा ती लाजते किंवा लाजून हसते . पहिल्या दोन प्रकारात आपला हिरो लवकर हार मानायचा नाही , तसाच तिसऱ्या प्रकारात लवकर हरखून पण जायचा नाही . सगळे ग्रहमान जुळून आले की मग तीही पाघळायची , असेच व्हायचे खूपदा !

पुढली स्टेप म्हणजे प्रत्यक्ष ओळख , बरीचशी औपचारिक ! इकडची पार्टी तेवढीच धाडसी असेल तर मग भेटायला बोलावणे व्हायचे . असेच शिवाजी पार्क चौपाटी किंवा वरळी सी फेस ! लगेच कुठे ? आहो अजून  तिकडच्या पार्टी कडून 'हो' कुठे आलाय ? 

'हो' म्हणायला किमान आठ दहा दिवस असेच निघून जायचे . इकडच्या पार्टीची अविरत धडपड सुरू असायची , एखाद्या कॉमन मैत्रिणीकडून पुन्हा विचारणे व्हायचे . मग आढेवेढे घेत होकार यायचा तोही तहाच्या काही अटी घेऊनच !
एकटी भेटणार नाही , बरोबर मैत्रीण पण असेल , जास्त वेळ भेटणार नाही , सुट्टीच्या दिवशी अजिबात नाही आणि सगळ्यात मोठ्ठी अट म्हणजे 'फक्त भेटायचे!' अनुभवी लोकांनी याचा अर्थ व्यवस्थित काढला असेल , तोच तो ! अशी सुरवात व्हायची .
प्रतिक्षा संपून मग तो दिवस उजाडायचा . आमचा हिरो मस्तपैकी दाढी करून टी शर्ट जीन्स घालून अंगावर भरपूर ब्रूट्स मारून भेटायला जायचा . ती सुद्धा ठेवणीतला ड्रेस घालून बऱ्यापैकी मेकअप करून आपल्या मैत्रिणी बरोबर मग चौपाटीवर यायची . सोशल डिस्टन्स ठेवून मग वाळूत बसायचे तिघेजण . तिची मैत्रीण असल्याकारणाने तो पण मग त्याला माहित असणारी सगळी माहिती पुन्हा विचारायचा .  म्हणजे कुठल्या चाळीत राहते , कुठल्या कॉलेजमध्ये आहे , एफ वायला आहे की एस वाय ला , वगैरे वगैरे . ती आधी तिला किती सख्खे आणि किती मानलेले भाऊ आहेत ते सांगायची . कुठल्या भावाने कुणाला कसा दम दिला आहे हे ओघाओघात सांगून मोकळी व्हायची . हे म्हणजे तिची डिफेन्स सिस्टीम किती भक्कम आहे याचा एक ट्रेलर असायचा . आपल्या हीरोला त्याने काडीमात्र फरक पडायचा नाही . थोडी भीड चेपल्यानंतर मग थोड्या हलक्याफुलक्या गप्पा व्हायच्या . नंतर पाणीपुरी की शेवपुरी यावर चर्चा व्हायची . शेवपुरी आवडत असेल तरी ती म्हणाली म्हणून पाणीपुरी आवडते असे कबूल करून मोकळे व्हायचा . त्यानंतर तीन पाणीपुरी , पुढे विषय निघाला आणि हीरोचे बजेट असेल तर एक कालाखट्टा बर्फाचा गोळा व्हायचा . बजेट असायचेच , म्हणजे त्याच्याकडे शे दोनशे असतील तरीही शुभचिंतक मित्रांनी अजून पन्नास एक रुपये देऊन ठेवलेले असायचे , मित्र असतातच असे ! आतापर्यंत शहाणी असेल तर ती मैत्रीण दोघांना थोडा थोडा स्पेस देऊ लागलेली असायची . मग निघता निघता पुढल्या भेटीची वेळ ठरायची . तो मैत्रिणीची नजर चुकवत तिला सुचवायचा की पुढल्या वेळी एकटी भेट , ती सुद्धा मग लाजत लाजत कपाळावर आलेले केस एका हाताने नाजूकपणे मागे सारत 'हो' म्हणून नजर चुकवायची . निरोप घेताना शेजारच्या काकूंच्या घरातला फोन नंबर ती द्यायची आणि कुठल्या वेळेला फोन करायचे ते सांगायची . सहसा पुढल्या भेटीची तारीख आणि वेळ पहिल्या भेटीतच ठरायची आणि ती पाळली जायची . 

काय म्हणालात ? नाही हो , कुठले व्हाट्सएप , फेसबुक आणि इन्स्टाग्राम ? मोबाईल फोन ही कल्पना सुद्धा स्वप्नात नव्हती . पण हे लाईन मारणारे बहाद्दर आणि सगळ्याच मुली शब्द पाळायच्या , वेळ पाळायच्या . सहसा तीच त्याच्याबरोबर बोहल्यावर चढायची . छान संसार फुलायचा . गेले ते दिवस . एक सृजनशील , लाघवी आणि क्रांतिकारी प्रथा आज बंद पडली आहे ....!!😃

     

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

श्रीमंत डब्यातील गरीब माणसे.......

  श्रीमंत डब्यातील गरीब माणसे....... AC च्या डब्यातील भाजणारे वास्तव............ आयुष्यात पहिल्यांदा AC ने प्रवास केला. डब्यात सेवेसाठी नेमल...